महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास ः अनेक राज्यांच राष्ट्र महा-राष्ट्र
प्राचीन काळात अगदी महाभारता नंतरचा विचार केला तरी पूर्वीपासून आपल्या राष्ट्राची नैसर्गिक पध्दतीने दोन विभागात विभागणी केली जाते. ज्याची मध्यभागा ही नर्मदा नदी ठरवली गेली आहे. नर्मदा नदीच्या वरच्या भागाला उत्तर भारत आणि खालच्या भागाला दक्षिण भारत असे नाव पडले आहे जे आजही प्रचलीत आहे.
नर्मदा नदीच्या दक्षिण भागापासून ते आजच्या कन्याकुमारीपर्यंतच्या भागाला पूर्वी दक्षिणापथ किंवा दंडकाराण्य या नावाने ओळखले जात होते. दंडकाराण्य या नावाने या प्रदेशाला ओळखण्याच कारण म्हणजे त्याकाळी या भागात तुरळक ठिकाणी नागरीवस्ती होती आणि अधिकतर भाग जंगलाने व्यापलेला व खडकाळ असा होता, त्यामुळे लहान लहान गुन्ह्यांतील शिक्षा झालेल्यांना या भागात दंड म्हणून आणून सोडले जात होते. त्यामुळे या भागाला दंडकाराण्य नाव पडले. रामायण काळातही प्रभू रामचंद्र हे दंडकाराण्यात आले होते, पुढे लंकेलाही येथूनच गेले.
प्राचीन काळात आपल्या महाराष्ट्राला अनेक नावाने अनेकांनी संबोधले आहे. त्यामुळे त्याचा इतिहासही येथे समजणे गरजेचे आहे.
दंडकाराण्याचा उल्लेख हा प्राचीन काळात उदयाला आलेले मराठवाडयातील एकमेव बलाढय राज्य म्हणजे यादवांच. यादव राज्याचा महामंत्री हेमाद्रीने म्हटलेले की, व्रतखंडाच्या प्रारंभी देवगिरी सेऊण देशात आहे व सेऊण देश दंडाकाराण्याच्या सीमेवर आहे.
सेऊण देश म्हणजे आजचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हे गाव आहे. यादव घराण हे मूळ सिन्नर गावचे रहिवाशी होते.
महाराष्ट्राला दक्षिणापथ असे म्हटल्याचे अनेक पुरावे मिळतात ज्यात समुद्रगुप्ताच्या आजच्या प्रयागराज येथील स्तंभावर, महाराष्ट्रातील नाणेघाटातील लेण्यामधील शिलालेखावर आणि क्षत्रप रुद्रदामन याच्या गिरीनारावरील शिल्लालेखात याचा उल्लेख आलेला आहे.
याच बरोबर रामायण, महाभारत, बौध्दयन स्मृतीत, कौटिल्य उर्फ चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्येही अश्या साहित्यामध्ये दक्षिणापथाचा उल्लेख सापडतो.
दक्षिणापथ म्हणजेच दंडाकारण्य प्रदेशाची पूर्वीच्या काळातील सीमारेषा सांगणे तसे कठिण आहे परंतु अनेकांनी आपल्या वेगवेळ्या साहित्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे त्यावरुन ढोबळपणाने याची सीमारेषा आपल्याला निश्चित करता येते.
वात्स्यायन ऋषीनी आपल्या कामसूत्र ग्रंथात नर्मदायाः दक्षिणेन देशो दक्षिणापथः लिहिले आहे. त्यापुढे प्राचीन काळातील अजून एक लेखक भरताने आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथात लिहिले की,
महेन्द्रो मलयः सह्यो मेकलः पलपिंजरः
एतेषु ये श्रिता देशाः स ज्ञेयो दक्षिणापथः
यावरुन या पर्वतरागांमधील प्रदेशही दक्षिणापथ होता व तो दक्षिण भारतात होता.
उत्तर भारतातील प्राचीनकाळातील प्रसिध्द आर्युवेदाचार्य म्हणून ज्याचा उल्लेख होतो तो म्हणजे वराहमिहिर याने आपल्या बृहत्संहितेतील 10 व्या अध्यायात लिहिले की, भाग्ये रसविक्रयिणः पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्रः याचा अर्थ पाचव्या शतकातील वराहमिहिरला दक्षिणापथ माहिती होते.
सहाव्या शतकात संस्कृत ग्रंथकार दंडीने आपल्या सेतुबंध रचलेल्या काव्यात महाराष्ट्रातील प्राकृत भाषेची स्तुती केली आहे.
सहाव्या शतकात चीनी प्रवासी ह्यूएनत्संग हा आर्यवृत्ताचा प्रवास करण्यासाठी व बौध्द धर्माचा आभ्यास करण्यासाठी आला होता तो दक्षिणेत आला होता व त्याने महाराष्ट्राला मोहालशो या नावाने संबोधले असून याचा भौगोलीक विस्तार हा एक सहस्त्र मैल असल्याचा उल्लेख केला आहे.
आठव्या शतकातील मुरारी याने अनर्घराघव या ग्रंथात महाराष्ट्राचा उल्लेख केला आहे. तर दहाव्या शतकातील नाटककार राजशेखर याने विदर्भ व महाराष्ट्र हे एक असल्याचे सांगितले.
अरब प्रवासी अलबेरुणी हा आर्यवृत्ताचा प्रवास करताना दक्षिण भारतात आला होता आणि त्याने धारेकडून दक्षिणेकडे जात असताना वाटेत मरहट्ट देश, कोकणप्रांत व त्याची राजधानी ठाणे लागते असल्याचे म्हटले.
दक्षिण भारतातील आजच्या काळातील कर्नाटक राज्यात सत्तेवर असलेल्या बदामीच्या चालुक्य राजा दुसरा पुलकेशीच्या दिग्विजयाचे वर्णन ऐहोळ येथील एका जैन मंदिरात जैन कवी रविकीर्तिने कोरलेल्या सहाव्या शतकातील एका शिलालेखात महाराष्ट्राचे वर्णन केले आहे. तो लिहितो,
कोकणेषु यदादिष्टचंडदण्डांबुवीचिभिः उदस्तास्तरसा मौर्यपल्वलांबुसमृध्दयः
प्राचीन काळात अनेक भाषा विविध ठिकाणी बोलल्या जात होत्या. प्राकृत भाषेचा प्रभाव असलेला एक मोठा प्रदेशही या ठिकाणी अस्तित्वात होता. जो आज महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळी या महाराष्ट्रात अनेक लहान लहान राज्य अस्तित्वात होती जसे की विदर्भ, अश्मक, अपरान्त (कोकण), मूलक, सेऊण, कुंतला इत्यादी. या सर्वांचा समावेश एकाच विशाल भूभागावर होता. यात विदर्भ हा आजही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग म्हणून अस्तित्वात आहे. आताचा कोकण याला पूर्वी अपरान्त या नावाने ओळखले जात होते. तर सेऊण हा नाशिक जिल्ह्यातील एक छोटेसे संस्थान होते पुढे जे देवगिरीचे राज्य म्हणून ओळखले गेले.
महाराष्ट्रावर उत्तर भारतातील अनेक मोठ्या राजवटीचेही राज्य होते जसे की कोकण प्रांतात मौर्य घराण्याचे राज्य होते. तर दक्षिण भारतातील म्हणजेच आजचे आंध्र व तेलंगाणा राज्यातील, कर्नाटकातील काही राजांचे राज्य अस्तित्वात होते.सातवाहन, बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, चेर, चौल गोव्याचे कदंब घराणे इ. घराण्यांनीही राज्य केलेले आहे.
महाराष्ट्रातही प्राचीन काळी काही राजघराणी उदयाला आली ज्यात वाकट घराणे, शिलहार घराणे दक्षिण कोकण व उत्तर कोकण आणि कोल्हापूरचे शिलहार घराणे, देवगिरीचे यादव घराणे.
देवगिरीचे राज्य 12 व्या शतकात नष्ट झाल्यानंतर मराठवाडा हा प्रांत पूर्णपणे मुस्लिम राजवटीखाली आला गेला.
मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रात मुस्लिम व ब्रिटिश सत्तेचा अमंल राहिला होता
प्राचीन काळात जरी महाराष्ट्र हा अखंड प्रदेश नव्हता तरी महाराष्ट्र प्रांताची रुपरेषा त्याकाळात साकारली गेली असल्याचे समजते. महाराष्ट्र प्रांत 1 मे 1960 ला अस्तित्वात आला तरी प्राचीन काळातील त्याचे अस्तित्व होते हे समजते. महाराष्ट्राची प्रादेशिक रचना ही पूर्वीपासून विखूरलेली होती. वेगळ्या राजवटीमध्ये महाराष्ट्र अस्तित्वात होता.



