अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करणार – शरद भुतेकर

आष्टी –
अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आष्टी पोलिसांनी कंबर कसली असून अवैध व्यावसायिकांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिली.
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नुकताच पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील अवैध
व्यवसाय मोडीत काढण्याची भीष्म प्रतिज्ञा घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना दिल्यानंतर आष्टी पोलिस आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत.
आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर स्वताः यांनी आपल्या पथकाच्या मदतीने अवैध व्यावसायिकांचा शोध सुरु केला आहे. आष्टी व परिसरात अनेक ठिकाणी अवैध हातभट्टी व त्यासाठी लागणारे रसायन उध्वस्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल.व पुढील काळात अवैध गावठी दारू , बेकायदेशीर दारू विक्री , सर्व हॉटेल व्यवसायिकांना रात्री ठरवून दिलेल्या वेळेत हॉटेल बंद करण्यासाठी सूचना दिल्या आहेत नसता कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याची माहिती भुतेकर यांनी दिली.
तालुक्यातील अवैध दारुव्यवसाय करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही सुरु करण्यात आली आहे. अशा वारंवार गुन्हे करणा-या व्यावसायिकांवर झोपडपट्टी दादा कायदाअंतर्गत कारवाई होणार आहे. पोलिसांनी या कारवाईची व्याप्ती अधिक वाढवून अवैध दारु व्यावसायिकांना दारु पुरविणा-या वाईन शॉप व बार मालकांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे कॉलेज परिसरात धूमस्टाईल रोडसाईड रोमिओंवरही पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. अवैध दारु , मटका , जुगार , अंमली पदार्थ यांविषयक तक्रार असल्यास माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक ९८५१५११३३३ या क्रमांकावर थेट संपर्क साधावा असे आवाहन पो.नि.शरद भुतेकर यांनी केले आहे.
