चोरीचे सोने घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील नांदूर घाटच्या व्यापाऱ्यावर कारवाई; छतावरून उडी टाकून पळाला
केज — चोरीच्या सोन्याचा तापस करत तामिळनाडूतील पोलिस अखेर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाटला पोहचले व केज पोलिसांच्या मदतीने सोन्याच्या व्यापाराच्या घरावर छापा टाकला परंतु व्यापारी पसार होण्यात यशस्वी झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
तामिळनाडूत दरोडा टाकून चोरीचे एक किलो 200 ग्रॅम वजनाचे एक कोटी रुपये किमतीचे सोने नांदूर घाट येथील सोन्याच्या व्यापाऱ्याला विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तामिळनाडू पोलीस व केज पोलीसांनी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी नांदुरघाट येथील व्यापाऱ्याच्या घरावर अचानक छापा टाकून कारवाई केली. पोलीस आल्याचे पाहून सोन्याच्या व्यापारी घराच्या छतावरून उडी टाकून पसार झाला आहे.
तालुक्यातील नांदूरघाट येथील सोन्याचे व्यापारी असलेल्या अनिल बडे याने तामिळनाडू राज्यातील चोरीच्या घटनेतील चोरांनी चोरी केलेले तब्बल एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचे अंदाजे एक कोटी रूपये किंमतीचे सोने तडजोडीत केवळ पंचेवीस लाख रूपयाला चोरांकडून घेतले होते.
या चोरीच्या घटनेचा तपास करणाऱ्या तामिळनाडू पोलीसांनी या चोरीच्या गुन्ह्यातील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चोरीचे सोने कोणाला विकले याची माहिती घेतली. त्या तीन संशयितांना घेऊन केज पोलीसांच्या मदतीने सोमवारी सकाळी नांदुरघाट येथील संबंधीत सोन्याच्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला.त्यावेळी पोलीस आल्याचे पाहून अनिल बडे हा घराच्या छतावरून उडी टाकून पसार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस नांदुरघाट येथे ठाण मांडून आहेत. व्यापाऱ्याने ठरलेल्या पंचेवीस लाख रक्कमेपैकी चौदा लाख रूपये चोरांना दिले असून अकरा लाख रुपये देणे बाकी आहेत.
ही कारवाई तामिळनाडू पोलिसांसह केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूरघाट पोलीस चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे व शमीम पाशा यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून तामिळनाडू पोलीस चोरीच्या घटनेत ताब्यात घेतलेल्या तीन चोरांना घेऊन नांदूरघाट मध्ये तळ ठोकून आहेत.
विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये, यासाठी तामिळनाडू पोलीस वाहनाला बनावट नंबर प्लेट खोटा नंबर लावून ही कारवाई केली आहे. या तामिळनाडू पोलीसांच्या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.