घन भरले… या नव्या रोमँटिक भावगीताचे प्रकाशन

अंजली नातू व पुष्पा चौधरी यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे – संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संध्याकाळ ठरली, जेव्हा घन भरले हे नवीन मराठी रोमँटिक भावगीत एका सुंदर कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री पुष्पा चौधरी आणि ख्यातीप्राप्त गायिका अंजली नातू यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीबरोबरच हिंदी गाण्यांचा एक बहारदार कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

या गीताचे गीतकार स्वरश्री, संगीतकार पं. ह्रषिकेश महाले आणि गायकद्वयीही पं. ह्रषिकेश महाले व स्वरश्री हेच असून त्यांनी अतिशय भावपूर्ण सादरीकरण केले. घन भरले हे शीर्षक असलेले हे गीत आपल्या संगीतमय रचनेने उपस्थित रसिकांचे मन जिंकून गेले.
या प्रसंगी विविध संगीत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये अमोल कुलकर्णी, श्रीमती कुलकर्णी (स्वरश्री यांच्या मातोश्री), श्री. विनोद कांबळे यांचा विशेष समावेश होता.
कार्यक्रमात गायन सादर करणार्या चमूने संपूर्ण वातावरण रंगतदार केले. केतकी जाधव, अनुजा पंडित, वैशाली नेमाडे, अश्विनी देशपांडे, राजेंद्र महामुनी, अरुण शेलार यांनी सुरेल सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमानंतर पं. ह्रषिकेश महाले आणि स्वरश्री यांनी घन भरले व्यतिरिक्त काही उत्कृष्ट गज़ल्सही सादर केल्या.
निवेदनाची जबाबदारी श्री. घनश्याम अग्रवाल यांनी समर्थपणे पार पाडली. कार्यक्रमासाठी हेमंत उत्तेकर यांचे साउंड सिस्टिम, नगण्णा झलकी यांचे छायाचित्रण व्यवस्था आणि शितल यांचे व्हिडिओग्राफी होती.
कार्यक्रमात अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी स्वतः एक भावगीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली आणि आपल्या भाषणात घन भरले या नव्या गाण्यास मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे
गायिका अंजली नातू यांनीही एक सुरेख गीत सादर करून नव्या गीताला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी घन भरले या गीताच्या रेकॉर्डिंगमध्ये सहभागी झालेल्या कोरस टीमचाही विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये आर्या , केतकी , स्मिता , वरदा , ऋतुजा यांच्या सहभागाचा विशेष उल्लेख झाला.

आपल्या भाषणात पं. ह्रषिकेश महाले यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, नवीन निर्मिती हीच खर्या अर्थाने कलाकाराची ओळख असते. संगीत क्षेत्रात नवे प्रयोग आणि निर्मिती ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध गायिका स्वरश्री यांच्या आवाजात एका खास भैरवीने व आभारप्रदर्शनाने झाली.