विशाल महारगुडेंच्या शास्त्रीय गाण्याने बीडकर मंत्रमुग्ध

स्वरगंध संगीत विद्यालयाकडून बीडकरांसाठी शास्त्रीय गायनाचे विशेष आयोजन
बीड प्रतिनिधी – बीड शहरातील स्वरगंध संगीत विद्यालयाने आयोजीत केलेल्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाने अनेक वर्षानंतर रसिकांना शास्त्रीय गायन श्रवणाचा योग मिळाला असून किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक विशाल महारगुडे यांनी विविध रागातून गीत सादर करत बीडकरांना मंत्रमुग्ध केले.
बीड शहरात दि. 11 मार्च 2025 रोजी बीड येथील स्वरगंध संगीत विद्यालयाच्या वतीने शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम दत्त मंदिर येथे उत्साहात पार पडला. नव्या पिढीला शास्त्रीय गाण्याची आवड निर्माण व्हावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून किराणा घराण्याचे पंडित कैवल्य कुमारजी गुरव यांचे शिष्य विशाल महारगुडे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी हे आमंत्रित होते तर उद्घाटक म्हणून लोकप्रश्नचे संपादक दिलीप खीस्ती हे उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रेरक वैद्य यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला . तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.एस.के. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आनिता शिंदे यांनी केले. सौ सुवर्णा कुलकर्णी (धुतेकर) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शास्त्रीय गायक महारगुडेनी राग दुर्गाचा बडा ख्याल…. लाल जिन करोरे हा गायला . अप्रतिम अशी रागाची विलंबित मांडणी करत त्यांनी किराणा घराण्याची खासियत यातून स्पष्ट केली .
छोटा ख्याल भुपमध्ये सगरी रैन ही चीज गाऊन सुरेल ताण व बोलबाट स्वरांची सजावट नजाकितीने सादर केली . बैरन भई हा दादरा उत्तम रीतीने त्यांनी दमदार मांडणीतून मांडला.

दत्तप्रभूच्या चरणी लीन होऊन त्यांनी दत्त दत्त म्हणता लागले ध्यान हा अभंग सादर केला . तसेच करूंगा मै ध्यान तेरा हे भजन गाऊन रसिकांची दाद मिळवली. तदनंतर जाने नही देत मोहे कन्हाई या बहारदार भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली .
या कार्यक्रमासाठी खास संभाजीनगर येथून आलेले डोळे बंधू यांनी उत्तम साथ केली, हार्मोनियमवर दिनेश डोळे यांनी साथ देऊन वाजवण्यातील सहजता व मोजकेपणा श्रोत्यां पर्यंत पोहोचवला. तबल्यासाठी गणेशी डोळे यांनी अवर्णनीय साथ संगत केली . पखवाज वादक म्हणून ज्ञानेश्वर भोसकर यांनी साथ देऊन भजनात रंगत आणली . तानपुराच्या साथीसाठी युवक अर्जुन महानोर यांनी साथ दिली. टाळ वाजवण्यासाठी छोटा सुमित कुलकर्णी यांने साथ केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरगंध संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले . संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी चंपावती नगरीच्या सर्व कलाकारांनी हजेरी लावली.

