गझल आता सर्वसामान्यांची प्रिय काव्यसखी बनली -डॉ. सुनंदा शेळके

नवी मुंबईत रंगले महिला गझल संमेलन; कार्यक्रमाला रिसकांचा उस्फुर्त प्रतिसाद
मुंबई : गझलेने सामाजिक आणि राजकिय भानही आपलेसे केले. कालानुरूप पुढे सरकताना कितीतरी वळणे घेत, चढ-उतार सांभाळत, गझल आता सर्वसामान्यांची प्रीय अशी एक काव्यसखी होऊन गेली आहे. इतर अनेक काव्यप्रकारांहून गझल सर्वांना जवळची वाटण्याचे कारण म्हणजे ‘आपल्याच भावना प्रकट झाल्याचा’ रसिकाला प्रत्यय देण्याची तिची क्षमता, हेच तिचे शक्तिस्थान आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकारा डॉ. सुनंदा शेळके यांनी केले.
नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ, हेमलता पाटील, डॉ. स्नेहल कुलकर्णी, प्रमोद खराडे, डॉ. कैलास गायकवाड, आप्पा ठाकूर आदी उपस्थित होते. डाॅ. शेळके यांनी स्त्री गझलकारांच्या लेखनावर प्रकाश टाकत, त्यांच्या लेखनातील वेगळेपण व सौंदर्यस्थळांचे वर्णन केले.

त्यांनी गझल लेखनात आशय, सौंदर्य आणि प्रतिभेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या भाषणातून गझलप्रेम, तिच्याशी असलेली एकात्म भावना, आणि नवीन गझलकारांसाठी उत्तम गझल लेखनासाठी आवश्यक मूलतत्त्वांविषयी बारकावे स्पष्ट केले. शेवटी, गझलेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी तिच्या मर्मस्पर्शी शक्तीचा गौरव केला. गझलेचे सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक प्रवासातील महत्त्व विशद करताना त्यांनी तिच्या सौंदर्यपूर्ण रचनेसंबंधी विचार मांडले. तसेच त्यांनी गझलमंथन संस्थेचे कार्य, उत्तम नियोजन, आणि नवोदित गझलकारांना दिलेले प्रोत्साहन याबद्दल कौतुक केले. संमेलनाला उपस्थित प्रमुख अतिथींनी देखील गझलेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

या संमेलनात विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणारा मानाचा गझलक्रांती पुरस्कार सुनिता रामचंद्र यांना प्रदान करण्यात आला. तसेच गझल सोबती पुरस्कार उद्योजक डॉ. कौतिक दांडगे यांना देण्यात आला. यंदाचे गझलयात्री पुरस्कार डॉ. मनोज वराडे, मानसी जोशी, सचिन इनामदार व प्रणाली म्हात्रे यांना देण्यात आला. स्व. जबनाबेन सोमजी पाटील गझलध्यास पुरस्कार माधुरी खांडेकर यांना देण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रणाली म्हात्रे (मुंबई जिल्हाध्यक्ष, गझल मंथन साहित्य संस्था) यांनी केले. संमेलनात उत्तरोत्तर गझल मुशायरे रंगत गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला गझलकारांनी मुशायऱ्यात रंगत आणली. गझल संमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, मुंबई जिल्हा कार्यकारिणी व कोकण विभागीय कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.
