कुंभ मेळावा आणि हिंदू धर्मातील आखाडे व त्यांचे कार्य

भारतातील उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळावा होत असतो आणि एका ठिकाणी तो झाला की पुढे तीन वर्षाने दुसर्या ठिकाणी होतो त्यामुळे पहिल्या स्थानावर तो परत भरताना तो 12 वर्षाने भरत असतो. यावर्षी तो 14 जानेवारी पासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत आहे. कुंभ मेळावा संक्रांतीला सुरु होतो हा एकमेव सण किंवा मेळावा आहे जो इंग्रजी तारखे प्रमाणे आपण साजरा करत असतोत. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो आणि तो दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे भ्रमण करत जातो त्यामुळे या दिवसाला उत्तरायण असेही म्हणतात. सूर्य हा दक्षिण आणि उत्तर या दिशेलाच भ्रमण करत असतो त्यामुळे याला आयण म्हणतात, त्यामुळे दक्षिणयाण आणि उत्तरायाण असे दोन आयण आहेत जे दर सहामहिन्याला बदलतात. कुंभमेळावाही या मकर संक्रांतीपासून सुरु होतो.

कुंभ मेळावा हा षौष पौर्णिमा ते महाशिवरात्रीपर्यंत चालू असतो आणि यात मकरसंक्रांती, मौनी म्हणजेच दर्श अमावस्या, वसंत पंचमी, माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्र या पाच दिवशी शाही स्नानांना महत्व आहे.
प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळाव्यात यावर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांत, 29 जानेवारीला मौनी म्हणजेच दर्श अमावस्या, 3 फे ब्रुवारीला वसंत पंचमी, 12 फे ब्रुवारीला माघ पौर्णिमा आणि 26 फे ब्रुवारीला महाशिवरात्री या दिवशी शाही स्नान होणार आहेत.
उज्जैन हे महादेवाचे तिर्थस्थान मध्यप्रदेशात आहे, त्रिवेणी संगम असलेले प्रयागराज हे उत्तरप्रदेश, गंगाकाठावर असलेले हरिद्वार हे उत्तराखंड आणि गोदावरी काठावरील त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रात आहे. या कुंभ मेळाव्याचे व्यवस्थापन आणि संचालन हे विविध आखाड्यांची मिळवून तयार केलेली अखिल भारतीय आखाडा परिषद करत असते.
भारतात असे किती आखाडे आहेत आणि त्यांचे उद्देश काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यांचे महत्व काय आहे ज्यामुळे त्यांना कुंभमेळाव्यात ऐवढे महत्व प्राप्त झाले आहे. तर चला या लेखात विविध आखाड्यां विषयीची माहिती आपण पाहूत.

भारतात एकूण 13 आखाडे सध्या कार्यरत असून ते वेगवेगळ्या उपासना पध्दतीशी संबंधीत आहेत. यात पहिली उपासना पध्दत ही शैव पंथी, दुसरी वैष्णव पंथी आणि तिसरी उदासीन पंथी आहे.
शैव आखाडे – हे अखाडे भगवान शिवाची पूजा करतात. तर वैष्णव आखाडे – हे भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांची पूजा करतात. उदासीन अखाडा हे ओम आणि गुरु नानक देव यांनी दिलेल्या उपदेशांचे अनुसरण करतात. या तीन गटामध्ये आखाड्यांचे विभाजन झालेले आहेत.
शैव संप्रदयात – जुना आखाडा, आवाहन आखाडा, अग्नि आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आनंद आखाडा आणि अटल आखाडा यांचा समावेश आहे.
वैष्णव संप्रदयातील आखाड्यांमध्ये – दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा यांचा समोवश होतो.
उदासीन संप्रदयातील आखाड्यामध्ये – उदासीन पंचायती बडा आखाडा, उदासीन पंचायती नया आखाडा आणि निर्मल आखाडा यांचा समावेश होतो.

या सर्व आखाड्यांची मिळून 1954 मध्ये अखिल भारतीय आखाडा परिषद स्थापन झाली असून या परिषदेचे मुख्य काम हे भारतातील चार ठिकाणी होणार्या कुंभ मेळाव्याची व्यवस्था व व्यवस्थापन करणे आहे आणि सर्व आखाड्यांमध्ये समन्वय ठेवण्याचे आणि वाद विवाद मिटवून सर्वांना निर्णय देण्याचे आहे. तसेच वेळोवेळी धर्म संसद भरवणे व त्यातील निर्णयांची अमंलबजावणी करण्याचे कामही ही अखाडा परिषद करत असते.
लेखक – डॉ.शामसुंदर रत्नपारखी, बीड.