हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत; रिव्हॉल्व्हर अन् जिवंत काडतूस जप्त
परळी : 2023 दिवाळी दरम्यान परळीच्या बँक कॉलनीतील घराजवळ वाहन पूजा करत असताना कैलास फड (रा. कन्हेरवाडी .हल्ली मुक्काम बँक कॉलनी परळी) याने आपल्या शस्त्रातातून हवे केलेल्या गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी याच्यावर परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यास गुरुवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. यावेळी गुन्हयातील रिव्हॉल्व्हर, 23 जिवंत काडतूस व 2 पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, फड यास परळी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या सूचने वरून पोलीस अंमलदार विष्णू फड यांनी 23 डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायर होत असल्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली त्यात मागील दिवाळीत परळी शहरातील बँक कॉलनी भागातील युवक कार्यकर्ते कैलास फड यांनी 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी वाहनाची पूजा करत असताना त्यांच्या जवळील रिव्हॉल्व्हर वरच्या दिशेने हवेत फायर केले असल्याचे खात्री पोलिसांना पटली .हवेत फायर करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी पोलीस अंमलदार विष्णू फड यांना 23 डिसेंबर रोजी सूचना दिल्या होत्या. व्हिडिओमध्ये कैलास फड हा हवेत फायर करत असल्याची खात्री झाली. त्यामुळे याप्रकरणी 23 डिसेंबर 2024रोजी त्याच्या विरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या नंतर तीन दिवसांनी कैलास फड यास परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती गुरुवारी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी दिली.
परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अभिलेखामध्ये जिल्हाधिकारी बीड यांच्या एका आदेशाने 27 फेब्रुवारी 2023 मध्ये योग्य त्या अटी व शर्तीसह कैलास फड यास शस्त्र परवाना देण्यात आला होता. या अटी व शर्तीचा भंग केला म्हणून कैलास फड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परळीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस बालाजी दराडे ,अंकुश मेंडके यांनी आरोपी कैलास फड यास गुरुवारी सकाळी परळीत अटक केली. त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी परळी न्यायालयाने सुनावली आहे आहे. ही कारवाई बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.