राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूकांचे बिगूल वाजले

बीड ः दि.15 डिसेंबर – राज्यातील बहुप्रतिक्षीत महानगर पालिका निवडणूकांची घोषणा करण्यात आली असून 15 जानेवारीला मतदान होणार आसल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील 29 महानगर पालिकांची निवडणूक अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर घोषीत झाल्या आहेत. यात जालना आणि इचलकरंजी ह्या दोन महानगर पालिका नव्याने स्थापित झाल्या आहेत. यात सर्वांत प्रतिष्ठीची निवडणूक ही मुंबई महानगर पालिकेची असणार आहे कारण ती राज्यातील सर्वांत जुनी महानगर पालिका असून येथे शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच बरोबर शिवसेना उध्दव ठाकरे गट हा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. तर सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट एकत्रीतपणे निवडणूक लढतील.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी -चिंचवड महानगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या ताब्यात असून येथेही अनेक पक्षांनी आपली ताकद आजमावण्याचे ठरविले आहे त्यामुळे चौरंगी किंवा पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
जालना व इचलकरंजी या दोन महानगरपालिकांची नव्याने स्थापना झालेली असून या आधी 27 महानगर पालिकांची मदत आधीच संपलेली आहे. यात पाच महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये, मुंबईसह 18 महानगरपालिकांची निवडणूक 2022 मध्ये आणि चार महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपलेली आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी होणार्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 23 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत असेल आणि उमेदवारी अर्जांची छाननी दि.31 डिसेंबर 2025 ला केली जाईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख 2 जानेवारी 2026 असून अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप 3 जानेवारी 2026 ला होईल. या महानगर पालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होवून निकाल घोषीत होतील.
राज्यातील मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, अमरावती, अकोला, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, उल्हासनगर, ठाणे,चंद्रपूर,परभणी,लातूर, भिवंडी, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर,नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाडा, जळगाव, अहिल्यानगर,धुळे,जालना, इचलकरंजी या महानगरपालिकांचा समावेश आहे.
वृत्तपर्व
संपादक -डॉ.शामसुंदर रत्नपारखी




