प्रतिक्षा संपली; आज सजणार भव्य ‘गझल मैफल’!

दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार
मुंबई: गझल मंथन साहित्य संस्थेचे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन दि. १९ जानेवारी रविवार रोजी नवी मुंबई येथे आयोजित केले आहे. ज्येष्ठ गझलकारा डॉ. सुनंदा शेळके यांची संमेलनाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला महाराष्ट्रासह देशभरातील नामांकित गझलकारा उपस्थित राहतील.
या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकारा उर्मिला बांदिवडेकर यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ व सुप्रसिद्ध गझलकारा हेमलता पाटील ह्या उपस्थित राहतील. डॉ. स्नेहल कुलकर्णी ह्या स्वागताध्यक्षा असतील. तसेच कार्यक्रमाला ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे व डॉ. कैलास गायकवाड यांचीही उपस्थिती लाभणार आहे. या संमेलनात गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणारा मानाचा गझलक्रांती पुरस्कार सुनिता रामचंद्र यांना प्रदान करण्यात येईल. तसेच गझल सोबती पुरस्कार उद्योजक डॉ. कौतिक दांडगे यांना देण्यात येणार आहे.
यंदाचे गझलयात्री पुरस्कार डॉ. मनोज वराडे, मानसी जोशी, सचिन इनामदार व प्रणाली मात्रे यांना देण्यात येणार आहेत. स्व. जबनाबेन सोमजी पाटील गझलध्यास पुरस्कार माधुरी खांडेकर यांना देण्यात येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली म्हात्रे करतील. त्यानंतर विविध सत्रात गझल मुशायरे रंगणार आहेत. त्यांचे अध्यक्षपद ममता सिंधुताई सपकाळ, मीना शिंदे, सुनेत्रा जोशी, डॉ. सुजाता मराठे, सुनंदा भावसार, प्रणाली म्हात्रे या भुषवतील. तर मुशायऱ्यांचे सूत्रसंचालन जयश्री कुलकर्णी, अंजली दीक्षित, दिपाली कुलकर्णी, दिपाली सुशांत, सुप्रिया हळबे व मनाली माळी करतील.

हे गझल संमेलन विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर १६- ए, वाशी बस डेपो समोर, जुहू वाशी रोड, वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे. या गझल संमेलनाचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, संयोजक व मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी, संमेलन समिती प्रमुख मुकुंदराव जाधव, समन्वयक प्रदीप तळेकर, मुंबई जिल्हाध्यक्षा प्रणाली म्हात्रे तसेच मुंबई जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
