जीवनाच्या प्रवासातील प्रकाशवाटेचे दीपस्तंभ

(लेखक : पं. ह्रषिकेश महाले)
गुरुपौर्णिमा हा दिवस माझ्यासाठी केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो एक अत्यंत वैयक्तिक, भावनिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. आज जे काही मी आहे, ते माझ्या गुरूंमुळेच. मागील ४६ वर्षांच्या संगीत प्रवासात मला अनेक श्रेष्ठ, थोर, प्रतिभावंत गुरूंचे मार्गदर्शन लाभले. या लेखातून मी माझ्या आयुष्यात आलेल्या त्या गुरूंना नमन करतो, त्यांच्या शिकवणीची आठवण करतो आणि ‘गुरू‘ या संकल्पनेच्या व्यापकतेवर चिंतन करतो.गुरू हा केवळ एक व्यक्ती नसतो, तो एक ऊर्जा असतो – जी आपल्या जीवनाला दिशा देतो, अंधारातून प्रकाशाकडे नेतो. “गु” म्हणजे अंधार आणि “रू” म्हणजे प्रकाश. गुरू म्हणजे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा.
गुरुपौर्णिमेचा दिवस हा दिव्य प्रकाशाच्या स्मरणाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे.

माझ्या संगीतप्रवासाला आरंभ झाला तो माझ्या घरातूनच. माझे आजोबा, कै. वसंतराव कुलकर्णी, हे माझे पहिले गुरु. त्यांच्याकडून मी सुरांचे, भजनांचे आणि भक्तिरसाचे पहिले धडे घेतले. त्यांच्या तोंडून ऐकलेले ओंकार, मंत्र आणि अभंग हे माझ्या मनावर खोल परिणाम करून गेले. त्यांची शांत, समाधानी वृत्ती आणि संगीताप्रतीची निष्ठा हीच माझ्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी ठरली.माझी आई, स्व. आशा महाले, या माझ्या आयुष्यातील दुसऱ्या गुरू. त्या एक प्रतिभावान कवयित्री, गायिका आणि अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी मला फक्त गायन शिकवलं नाही, तर गाणं ‘जगायला’ शिकवलं. त्यांच्या शब्दांमध्ये असलेली भावना, त्यांच्या गायकीतील सहजता, आणि त्यांच्या जीवनातील साधेपणा यांनी माझ्या संपूर्ण कलात्मकतेवर परिणाम केला. आज मी ज्या भक्तिगीते गातो,त्यातील शब्द किंवा भाव हा आईच्या संस्कारांचा परिपाक आहे.
स्व. मंदाकिनी चाफळकर या माझ्या गायनाच्या अधिक औपचारिक शिक्षणातील पहिल्या गुरू. त्यांच्याकडून मी राग, अलंकार, ताल, तान यांची शिस्त आणि नजाकत शिकली. त्यांनी मला गायकीचा आत्मा समजावून दिला – केवळ सूर लागत आहेत का यावर न राहता त्या सुरांमध्ये भावना किती आहेत हे समजावून दिलं. त्यांचं शिकवणं अजूनही माझ्या रियाजामध्ये घुमतं.
पद्मश्री पं. बाळमुरलीकृष्णन यांचं माझ्या संगीतातील स्थान विशेष आहे. दक्षिणेतील गायकीतली रंगत, रचनांतील वैविध्य, आणि त्यांनी गायनात केलेले प्रयोग हे माझ्यासाठी स्फूर्तिदायक होते. त्यांच्या संपर्काने माझ्या गायकीत एक नवं परिमाण तयार झालं. त्यांनी शिकवलेली रागांची शास्त्रीय खोली आणि सौंदर्यशास्त्र आजही माझ्या रचनांमध्ये झळकतं. माझ्या गायकीत भक्तिरसाचं स्थान विशेष आहे आणि या रसाचं शुद्ध, रसाळ आणि प्रभावी रूप मला पद्मश्री अनुप जलोटाजींकडून मिळालं. त्यांचं भजन गायन म्हणजे भक्ती आणि सौंदर्य यांचा संगम आहे. त्यांच्या गायकीतली प्रामाणिकता, शब्दोच्चारातील स्पष्टता, आणि सूरांतील गहिवर यामुळे मी भावगायकीच्या जवळ गेलो. ‘ऐसी लागी लगन’, ‘मैं नहीं मेरा मन गावे’ ही गीते आजही माझ्या अंतर्मनात रुंजी घालतात.
गझल हे माझ्या संगीतातलं एक खास क्षेत्र आहे आणि त्यामध्ये मला दिशा दाखवणारे गुरु म्हणजे स्व. पद्मभूषण जगजीतसिंहजी. त्यांच्याकडून मी गझल गायकीतली सहजता, नजाकत, आणि संयम शिकला. ते गझल गात नसत, ते त्या जगत असत. त्यांच्या स्वरांमध्ये शब्द जिवंत होत. माझ्या गझल गायकीत जिथे विराम असतो, तिथेही काहीतरी बोललं जातं – हे तंत्र मी त्यांच्याकडून शिकलो. माझ्या आजवरच्या गझल कार्यक्रमांमधील संवेदनशील सादरीकरण हे त्यांचंच प्रभाव आहे.
लता मंगेशकर यांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी अत्यंत पवित्र आहेत. त्यांच्या शब्दांमधून मला सदैव प्रेरणा मिळते. एकदा त्यांनी मला सांगितलं होतं – “भाव खरा असेल, तर सूर आपोआपच खरे वाटतात.” हे वाक्य मी मनावर कोरून घेतलं आहे. त्यांच्या गायकीचा दर्जा गाठणं अशक्य आहे, पण त्यांच्या स्वरांमधून प्रेरणा घेऊन मी माझ्या भावविश्वाला अधिक समृद्ध केलं आहे.
बाबूजी – अर्थात सुधीर फडके यांचे आशिर्वाद हे माझ्या संगीतप्रवासाच्या सुरुवातीचे मोठे बळ होते. १९८० साली त्यांनी माझ्या गायकीला एक व्यासपीठ दिलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी भावगीत आणि देशभक्तिपर गीतांमध्ये आपली ओळख निर्माण करू शकलो. त्यांच्या गाण्यांमधील साधेपणा, पण खोल अर्थ असलेली रचना यांचं आकर्षण माझ्या संपूर्ण कारकिर्दीत राहिलं आहे.
महेंद्र कपूरजींकडून मला आलापातील ताकद, गायकीतील व्यासंग आणि गाताना लागणारी शारीरिक मानसिक ताकद याचा अनुभव मिळाला. त्यांचा स्वर उंच, भारदस्त आणि भावपूर्ण होता. त्यांच्या एकेक गाण्यामध्ये ताकद आणि आत्मा असायचा. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अडचणींवर मात केली.
गुरू या केवळ संगीतातच नसतात. जीवनात अनेकदा काही अपरीचित भेटी, क्षण, अनुभव हे सुद्धा गुरूप्रमाणेच आपल्याला काही शिकवून जातात. माझ्या शिष्यांमधूनही मी शिकतो. त्यांचं नवीन प्रयोगशील दृष्टीकोन, नवे राग, तंत्रज्ञानाचं ज्ञान हे मला आजही विद्यार्थीसारखं ठेवतं. गुरू-शिष्य हे नातं केवळ शिकवणं आणि शिकणं यापुरतं मर्यादित नाही, ते एक आध्यात्मिक संबंध आहे.या संपूर्ण प्रवासात 2003 सालापासून माझ्या आयुष्यात एक अत्यंत मोलाचा, समर्पित आणि प्रेरणादायी सहचर म्हणून माझी पत्नी, Mrs. पूर्वा महाले यांचे योगदान हे उल्लेखनीयआहे. त्या केवळ माझ्या जीवनसाथी नाहीत, तर माझ्या संगीतप्रवासातील एक दृढ आधारस्तंभ आहेत. कार्यक्रमांचे आयोजन, विद्यार्थ्यांशी संवाद, संगीतकार्यशाळांची आखणी, आणि भावनिक आधार – या सर्व स्तरांवर त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहत मला निस्सीम पाठबळ दिलं. त्यांच्या सौम्यतेने, संयमाने आणि कलाविषयक जाणिवेने माझ्या अनेक उपक्रमांना दिशा मिळाली. माझ्या गुरुपरंपरेच्या साधनेत त्यांचं हे सहकार्य मला गुरूंच्या आशीर्वादासारखंच वाटतं.
आज माझ्याकडे ५०० पेक्षा अधिक शिष्य आहेत. देशभर आणि परदेशातही माझ्या गायकीच्या शिकवणीचा प्रसार झाला आहे. अनेक शिष्य आज स्वतः कलाकार म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांच्या यशात मला माझ्या गुरूंचं दर्शन घडतं. माझं गुरुत्त्व त्यांच्या यशात आहे.गुरुपौर्णिमा ही फक्त स्मरणरंजनासाठी नव्हे, तर आत्मपरीक्षणासाठी असते. आपल्या आयुष्यात कोणकोण गुरू झाले, त्यांनी आपल्याला काय शिकवलं, आपण त्यांचं कितपत पालन केलं – याचा विचार करायला लावणारा दिवस.
आज या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या सर्व गुरूंना नम्र अभिवादन करतो. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी संगीत, साधना आणि स्वरांच्या प्रवासात आजवर चालत आलो आहे आणि पुढेही चालत राहीन.
गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरू देवो महेश्वरः। गुरू साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥
