श्वास, स्वर आणि साधना -एक गायकाच्या नजरेतून योग

21 जून – आंतरराष्ट्रीय योग दिन. जगभर साजरा होणारा हा दिवस आता आपल्या देशातदेखील उत्साहाने स्वीकारला जातो आहे. योग म्हणजे शरीर, मन आणि प्राण यांची एकात्म साधना. आणि हीच साधना मी एक गायक, संगीतकार व योगाभ्यासी या नात्याने गेली अनेक दशके अनुभवत आलो आहे.
माझं गायनाचं व्यासपीठ 46 वर्षांपासून सुरू आहे. पण त्याही आधीपासून माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे – योग. लहानपणापासूनच ॐकार, प्राणायाम, अनुलोम-विलोम, भस्त्रिका, नाडीशोधन यांसारखे विविध प्रकार केले गेले. पुढे ते माझ्या संगीताच्या प्रवासाला एक नवसंजीवनी देणारे ठरले. गाणं म्हणजे केवळ सूर लावणं नाही; ते म्हणजे श्वास, मन, आणि आत्मा यांच्या संपूर्ण समर्पणाची प्रक्रिया.
योग आणि संगीत या दोन्ही प्राचीन भारतीय परंपरा आहेत. एकमेकांशी अतिशय जवळीक असलेल्या. आज योग दिनाच्या निमित्ताने, या दोघांच्या विलक्षण नात्याविषयी माझा अनुभव, अभ्यास आणि निरीक्षणे मांडावीत असे वाटते.गायनासाठी श्वासावर
नियंत्रण – मूळाधार
कोणतंही शास्त्रीय किंवा भावगीत गाणं गाताना स्वर महत्त्वाचा असतो, पण स्वर टिकवण्यामागे असतो श्वास. जर श्वास नियंत्रित नसेल, तर स्वर तुटतो, कंपित होतो आणि गाण्यातील भाव हरवतो.
मी जेव्हा दीर्घ स्थिर स्वर लावतो – तेव्हा तो 55 ते 60 सेकंदांपर्यंत टिकतो. यामागे कोणतीही टेक्निकल ट्रिक नाही, तर दीर्घकाळ चालत आलेला प्राणायामाचा सराव आहे. गायकासाठी श्वासावर नियंत्रण म्हणजे रियाजाचं पहिलं पाऊल आहे.
गाणं गाताना आपण पूरा श्वास घेतो – आणि तो एका रेषेत, स्थिरपणे वापरतो. ही कला नुसत्या सरावाने नाही, तर श्वसनावर जागरूकता (breath awareness) आणणार्या योगानेच शक्य होते
श्वासासाठी योग – संगीताचं आत्मशास्त्र
गायनशास्त्रात पूरक आणि रेचक ह्या संज्ञा आहेत. त्याचप्रमाणे योगामध्येही श्वास घेताना आणि सोडताना होणार्या प्रक्रियेचं महत्त्व मांडलेलं आहे.
योगासने ही शरीराची तयारी करतात – पण प्राणायाम म्हणजे श्वासावरचं संपूर्ण नियंत्रण.
संगीतासाठी उपयुक्त योगप्रकार
अनुलोम-विलोम: नाकाच्या दोन्ही छिद्रांतून श्वास घेणं आणि सोडणं – ज्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
नाडी शुद्धी: मानसिक शांतता, ध्वनीस्थिरता यासाठी उपयोगी.
भस्त्रिका आणि कपालभाती: पेटीच्या आवाजासारखा स्फोटक पण नियंत्रित श्वास तयार करणं.
ॐकार जप: दीर्घ श्वास आणि त्यातून निर्माण होणारा कंपन (vibration) हा गळ्याचे, छातीचे आणि मेंदूचे आरोग्य सुधारतो.
ही सर्व क्रिया नियमित केल्यास आवाजातील थरार, गाताना आवाज तुटणे थांबते आणि श्रवणशक्तीही वाढते.
दीर्घ स्वर = दीर्घ श्वसन
दीर्घ स्वर लावणं ही गायकाची ताकद समजली जाते. पण हे स्वर शुद्ध राहणं तितकंच महत्त्वाचं.
मी अनेकदा विद्यार्थ्यांना एकच पाठ शिकवतो – गाणं म्हणजे श्वासाचं सर्जन आहे.
जेव्हा तुम्ही श्वास दीर्घ घेतात, आणि संयमाने त्याचा वापर करता – तेव्हा आवाजात स्थैर्य येतं.
योगामुळे मिळणारे फायदे
श्वास भरून घेण्याची क्षमता वाढते (Vital capacity) वाढते.
आवाजाला वॉल्युम, थरार आणि स्थैर्य मिळतं
स्वरांमध्ये लवचिकता येते
मी स्वतः अनेक वेळा मोठ्या किंवा 10 मिनिटांच्या बंदिशीसाठी, एकाच breath वर आलाप घेतो – हे कुठल्याही औषधाने किंवा फक्त गळ्याच्या सरावाने शक्य नाही, तर ते श्वासावर नियंत्रण शिकवणार्या योगामुळेच शक्य झालं.
स्वरयंत्र आणि छातीचा उपयोग – योग्य योग कोणते ?
स्वरयंत्र, छाती आणि नासिकाप्रदेश – हे सर्व आपल्या ध्वनीनिर्मितीचे स्त्रोत आहेत. पण यांचा संपूर्ण वापर फार कमी लोक करू शकतात.
योगाचे उपयोगी आसन व प्राणायाम
भ्रामरी प्राणायाम: गुंजनाने आवाजाचे कंपन जाणवतात, यामुळे गळा खुलतो.
मंत्रोच्चारासोबत ॐकार: यामुळे रेझोनेन्स तयार होतो.
उज्जयी प्राणायाम: गळ्यातून संथ पण ठाम स्वर काढण्यासाठी.
मत्स्यासन, भुजंगासन: छातीचा भाग खुला करून श्वासाची खोली वाढवतात.
सिंहगर्जनासन (सिंहासन): गळ्याचे स्नायू मजबूत करतं, आवाज खुला होतो.
गायनाच्या दृष्टीने उत्स्फूर्तता आणि स्थैर्य ही दोन परस्परविरोधी शक्ती आहेत – पण योग यांच्या संतुलनाचं शास्त्र शिकवतो.
स्वरात प्राण फुंकणारा योग
गाण्यात भाव येतो तेव्हा – श्रोता भारावून जातो. पण तो भाव, त्या स्वरसंगतीत प्राण फुंकणं हे सहज घडत नाही.
प्राणायामाचा गायकाच्या मन:स्थितीवर खोल परिणाम होतो. मन शुद्ध आणि स्थिर असेल, तर गायनाचं रूप अधिक प्रभावी होतं.
योगामध्ये प्रत्याहार – म्हणजे इंद्रियांचा संयम शिकवला जातो. हेच गाणं गाताना उपयोगी ठरतं:
भीती कमी होते
मंचावर आत्मविश्वास वाढतो
स्वरांमध्ये हळुवारपणा आणि ताकद दोन्ही येतात
रोजच्या दिनचर्येत योग आणि संगीत
माझ्या दिवसाची सुरुवात कधीही रियाजाने होत नाही. ती होते शांत ॐकाराच्या उच्चाराने. त्यानंतर 15 मिनिटांचा प्राणायाम आणि मग रियाज.
हे तंत्र मी माझ्या शिष्यांनाही शिकवतो – आणि त्यांच्या प्रगतीत त्याचा मोठा वाटा असतो.
गायकाच्या दृष्टिकोनातून योगाचा संदेश
आजच्या पिढीला एकच सांगावंसं वाटतं – गायनासाठी फक्त राग, ताल, सूर शिका एवढंच पुरेसं नाही. स्वतःचा श्वास ओळखा, त्याचं विज्ञान समजा आणि त्याचं साधन करा – म्हणजे संगीत अधिक समर्पक, समाधानी आणि दीर्घकाळ टिकणारं होईल.
संगीत आणि योग – दोघंही आत्म्याशी जोडणारे मार्ग आहेत. स्वर हा फक्त ध्वनी नाही, तो श्वासाचा तपशील आहे.
मी गेली चार दशके ह्या दोघांच्या साथीने जगतो आहे. त्यामुळे हे दोघं माझ्यासाठी वेगवेगळे नाहीत – एकाच प्रवासाचे दोन टप्पे आहेत.
या योग दिनी मी प्रत्येक गायक, संगीतप्रेमी, विद्यार्थ्याला हे आवाहन करतो – की श्वासाकडे फक्त जगण्यासाठीची प्रक्रिया म्हणून न पाहता, साधनेचा आधार म्हणून पहा.
श्वास, स्वर आणि साधना – हे आयुष्यभर तुमचं संगीत उजळवतील
पं. ह्रषिकेश महाले, पुणे
(गायक, संगीतकार, योगाभ्यासी)