घन भरले… संगीतकार पं.हृषिकेश महाले आणि गीतकार स्वरश्री यांचा उत्कंट भावविश्वातला सुरावटीचा संगम

पं. ह्रषिकेश महाले व स्वरश्रींच्या आवाजातील प्रेमाच सुरेल गीत
पुणे (प्रतिनिधी)- मराठी संगीत सृष्टीत पुन्हा एकदा एका नवनिर्मित गीताची भर पडणार आहे. प्रेमभावनांनी ओतप्रोत भरलेलं, नाजूक शब्दांची नक्षी असलेलं आणि सुसंवादी संगीताने नटलेलं एक अद्वितीय मराठी रोमँटिक द्वंद्वगीत – घन भरले… – लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.
या गीताची संपूर्ण संकल्पना, रचना आणि सादरीकरण ही सगळ्याच दृष्टीने अत्यंत दर्जेदार आणि वेधक ठरली आहे. गीताचे बोल लिहिले आहेत गीतकार स्वरश्री यांनी. त्यांच्या लेखन शैलीमध्ये एक विशेष प्रकारची कोमलता, सौंदर्यदृष्टी आणि काव्यात्म भावना नेहमीच जाणवते. पाऊस आणि भावना यांची परस्पर गुंफण घन भरले या गीतामध्ये त्यांनी खूप सुंदररित्या केली आहे.
या सुरेल गीताला स्वर आणि संगीत दिलं आहे सुप्रसिद्ध गजल-भजन गायक, संगीतकार पं. ह्रषिकेश महाले यांनी. त्यांच्या सांगितीक कारकीर्दीचा व्यासंग मोठा असून त्यांच्या संगीताची खासियत म्हणजे त्यांच्या रचनांना शास्त्रीय संगीताची बैठक असून त्यास आधुनिकतेची जोड असते.

या गीताचं ध्वनीमुद्रण गंधर्व स्टुडिओ, पुणे येथे करण्यात आलं असून, स्वतः संगीतकार व गायक पं. ह्रषिकेश महाले यांनी या गीताला स्वरबध्द केले आहे आणि गीतकार स्वरश्री यानी गायलंयही आहे.
गीताच्या संगीत संयोजनात एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे बासरीवादक अविनाश वाघ यांनी. त्यांच्या बासरीतून गीतातील पावसाळी सरींचा नादच ऐकू येतोय असे भासते.
या गाण्याला अधिक समृद्ध करणारा घटक म्हणजे कोरसचा भाग, ज्यात खास क्रॉस सिम्फनीचा प्रयोग करण्यात आला आहे. पं.ह्रषिकेश महाले यांनी अतिशय कुशलतेने कॉयर्सच्या रचना, हार्मनीचा अंतर्भाव करून या गीताचे खूपच दर्जेदार संगीत संयोजन केलं आहे. कोरस गायनासाठी केतकी जाधव, आर्या, स्मिता गिरमे, वरदा बडबडे आणि ऋतुजा बक्षी या अनुभवी गायिकांचा सहभाग असून याचं रेकॉर्डिंग रेझोनन्स स्टुडिओ, पुणे येथे करण्यात आलं आहे.

या गीताची निर्मिती KCA- PHOENIX Studio या प्रतिष्ठित लेबलतर्फे करण्यात आली असून, 31 मे रोजी हे गाणं अधिकृतपणे रसिकांसमोर सादर केलं जाणार आहे.
घन भरले… हे गीत केवळ एक द्वंद्वगीत नाही, तर दोन संवेदनशील कलेच्या प्रवाहांचं संगमस्थळ आहे. गीतकार स्वरश्री यांची कवित्वशीलता, पं. ह्रषिकेश महाले यांचं सुरेल संगीत तसेच संगीत संयोजन आणि या दोघांच्या आवाजाची जादू – या त्रिसूत्रीच्या माध्यमातून हे गीत श्रोत्यांच्या मनामनात घर करून राहील, यात शंका नाही.

