मुलाखत

आवड असेल तरच कविता लेखनाच्या क्षेत्रात यावे – मनीषा भोसले

आपण कविता लेखानाकडे कसे वळलात?
उत्तर – कॉलेजमध्ये शिकत असताना पूर्ण हिंदी हा विषय घेतला होता आणि हा विषय शिकवणारे आमचे सर खूप शेर शायर्‍या वगैरे वर्गामध्ये ऐकवायचे, ती यमक जुळवलेली वाक्य ऐकायला छान वाटायचे, त्यातूनच लिहिण्याची आवड निर्माण झाली.
मराठी साहित्यात मराठी कविता लिहिणे याकरिता कवीकडे प्रथम कोणते गुण असावे लागतात?
उत्तर – मराठी भाषेत कविता लिहिण्यासाठी कविकडे संवेदनशीलता, दृष्टीकोन, जीवनानुभव, आणि भाषा संपन्नता आवश्यक असते.


कवितेच्या कार्यक्रमाला प्रेक्षक मिळत नाहीत असे बोलले जाते ते खरे आहे का?
उत्तर – नाही. कवितेच्या कार्यक्रमांनाही भरपूर गर्दी असते.लोकांचा प्रतिसाद चांगला असतो.
आपण लावणी, गझल, कविता यामध्ये रमतात, आपल्याला गीतकार व्हावेसे वाटते का?
उत्तर – होय.मी मुळात लिहायला सुरुवातच गाण्यापासून केली होती, गाणं ही माझी पहिली पसंती आहे.
कवीने विविध भाषांमधील मौलिक साहित्य वाचले पाहिजे तरच रचनेमध्ये ठसठशीतपणा येतो याबद्दल आपले मत काय?
उत्तर – एकदम बरोबर आहे. वाचनाने शब्दसंचय होतो. विषयामध्ये वैविध्य आणि खोली येते, त्यामुळे वाचन हे अत्यंत आवश्यक आहे.
आपले आवडते कवी कोणते? आपण कोणाला आदर्श मानता का?
उत्तर – मराठी भाषेतील कवींच एक नाव घेणं फार अवघड आहे. प्रत्येक कवीची स्वतःची अशी वेगळी शैली असते, वकूब असतो, म्हणून सर्व कविंच्या साहित्यांचा आस्वाद घ्यायला हवा.
आपण कोणते संगीत ऐकतात ?
उत्तर – मला महाराष्ट्रीयन लोकसंगीत विशेष करून आवडते.


कविता आणि गझल यामध्ये नेमका फरक काय?
उत्तर – कवितेचा आवाका छोटा मोठा असू शकतो.परंतु गझलेत अत्यंत कमी शब्दात मोठा आशय असतो. शिवाय एका गझलमध्ये अनेक विषय असू शकतात. गझल वृत्तातच लिहावी लागते.
कवींनी एकमेकांच्या संपर्कात रहावे, तसेच पुणे अथवा अन्य शहरात कोण कविता लिहीत आहे याचा शोध आपण घेता का?
उत्तर – होय. एकमेकांशी साहित्यावर चर्चा केल्याने निश्चितच फायदा होतो. विचारांचे आदान प्रदान होते. तसा माझाही प्रयत्न असतो.
कवितेच्या पुस्तकांची विक्री होत नाही असे प्रकाशक म्हणतात ते खरे आहे का?
उत्तर – काही अंशी खरे आहे, परंतु कवितासंग्रह जर उत्तम असेल तर निश्चितच विक्री होतो.


प्रातिनिधीक कविता संग्रह प्रकाशित व्हावे असे आपणास वाटते का? एकाच पुस्तकात विविध कवींच्या रचना असाव्यात असे वाटते का?
उत्तर – हो. प्रातिनिधीक कविता संग्रह असायला हरकत नाही. परंतु त्यातील कवींच्या साहित्याचे आधी मूल्यमापन व्हायला हवे.
कवितेच्या प्रांतात नव्याने प्रवेश करणार्‍या कवींना आपण काय सांगाल?
उत्तर – आवड असेल तरच या क्षेत्रात यावे. कुणीतरी लिहितंय म्हणून लिहू नका. या क्षेत्रात असाल तर उत्तरोत्तर आपल्या साहित्याचा दर्जा वृद्धिंगत कसा होईल याबाबतीत दक्ष असायला हवे, त्यासाठी वाचन, साधना आणि सादरीकरण याशिवाय पर्याय नाही

या सुखांनो या
गवसत असता काही निसटती कवडसे काही
पुनवेची गाता गाणी का अवस होते विराणी !
मनासारखे जगताना का खूपत राहते काहींना
का दूर दूर होते जगणे जगण्याशी जवळीक होताना
दुःख अनावर होताना का सुख पोरके होते
सुख मोहरून कधी येताना दुःखाला पालव फुटते
अलिकडचा सोरभ घेताना पलिकडचा ध्यास खुणावतो
अनमोल हाती असताना का मोल कराया निघतो
हे काठावरचे जगणे का होते केविलवाणे
हसता हसता ओघळते का, डोळ्यातील पाणी खारे ?
जगण्याच्या वेलीवरती का उर्मीचे घास लगडती
का अंतरातले सूर अनामिक या सुखांनो या म्हणती!
मनीषा भोसले

मुलाखातकार


डॉ.श्रीकांत तापीकर, पुणे

.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button