‘माध्यमांतील दिवस’ माध्यम क्षेत्राच्या वाटचालीचा दस्तऐवज-विजय कुवळेकर

पुणे
प्रसार माध्यम क्षेत्राच्या बदलत्या पर्यावरणाचा वेध घेत त्याच्या भविष्याच्या वाटचालीवर भाष्य करणारे हे पुस्तक म्हणजे माध्यम क्षेत्राचा गेल्या ४० वर्षांचा दस्तऐवज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय कुवळेकर यांनी केले . ‘माध्यमांतील दिवस’ या माध्यम तज्ज्ञ डॉ केशव साठये यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालाय प्रेक्षागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ वसंत काळपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अशा प्रकारच्या पुस्तकाची आवश्यकता सांगत शैक्षणिक दूरचित्रवाणीचे महत्व विशद केले.आकाशवाणीचे संचालक इंद्रजित बागल यांनी तरुण पिढीसाठी हे पुस्तक मार्गदर्शनपर ठरेल असे सांगत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रम निर्मितीसाठी सर्जनशीलतेची आणि प्रेक्षक श्रोते यांच्या गरजा जाणून घेण्याचे महत्व संगितले.
डॉ माधवी वैद्य यांनी दृश्य संवाद याचे कार्यक्रम निर्मितीतील स्थान कसे सेंद्रिय आहे हे सांगत माध्यमांची भाषा समजून घेण्याची गरज अधोरेखित केली . रुद्र प्रकाशनचे नवनाथ जगताप यांनी प्रास्ताविक केले तर लेखक डॉ केशव साठये यांनी आपल्या पुस्तक लेखनामागची प्रेरणा सांगितली. प्रा.देवदत्त भिंगारकर यांनी सूत्रसंचालन केले.