संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी घुलेला अटक
बीड – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिक घुले याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून दोन दिवसापूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात कारवाई करत या आधी दोन आरोपींना अटक केली होती.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिक भीमराव घुले (वय 25 वर्ष रा.टाकळी ता.केज जि.बीड) याला पुण्यातून अटक केली आहे. घुले हा देशमुख यांच्या हत्येनंतर पुण्याच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना कळल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. .
पोलिस निरीक्षक शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय झोनवाल, भागवत शेलार, बप्पासाहेब घोडके, तुषार गायकवाड, चालक मराडे यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी या प्रकरणात या आधी जयराम माणिक चाटे (वय 21 वर्ष रा.तांबवा ता.केज), महेश सखाराम केदार (वय 21 रा.मैंदवाडी ता.धारुर) यांना अटक केली आहे.