ताज्या बातम्या

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच! महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला!

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली.
गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.

विधीमंडळात बैठकीत काय घडलं?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. निकालानंतर आता 10 दिवस उलटून गेले आहेत. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केलेली आहे. पण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज 4 डिसेंबर रोजी विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा वेग
या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे हजर होते. यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले.

त्यानंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा वेग वाढला आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

आजच सत्ता स्थापनेचा दावा
देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी हे भाजपचे दोन्ही निरीक्षक राजभवनावर शिष्टमंडळासोबत जाण्याची शक्यता आहे.

उद्या शपथविधी सोहळा
आता भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. यानंतर उद्या गुरुवारी ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात नव्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल, असे सांगितले जात आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याला अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरु, संत-महंत उपस्थित राहणार आहेत.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button