पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात बीड मतदारसंघातील गाव आणि वस्त्यांचा सामावेश करा – आ.संदीप क्षीरसागर

बीड – जानेवारी ते जून २०२५ या काळातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये बीड मतदारसंघ क्षेत्रातील एकूण १६७ गाव आणि वाडी, वस्त्यांवर नवीन हातपंप बसवणे, बोअरवेल घेणे तसेच जुने हातपंप दुरूस्त करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
जानेवारी ते जून महिन्याचा कालावधी हा उन्हाळ्याचा असतो. या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होते. पाण्याअभावी नागरिक, शेतकरी आणि पशु-पक्षी यांना वणवण करावी लागते. त्यामुळे पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी वेळे अगोदर नियोजन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जानेवारी ते जून २०२५ या कालावधीतील होणार्या पाणीटंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये बीड मतदारसंघात क्षेत्रातील गाव आणि वाडी, वस्त्यांवर नवीन हातपंप बसवणे, बोअरवेल घेणे, जुन्या हातपंपाची दुरूस्ती करणे, बंद बोअरवेल सुरू करणे आदी बाबी सामाविष्ट करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
आ.क्षीरसागर यांनी बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील १६७ गावे, वाडी आणि वस्त्यांची यादीच जिल्हा प्रशासनाकडे पाठविली असून यादीतील नमूद ठिकांणावर पाण्याचे नियोजन करावे असे सांगितले आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.