गझल मंथनचा ‘गझलक्रांती’ पुरस्कार गझलकारा सुनिता रामचंद्र यांना जाहीर

मुंबई, दि. १० गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने महिला गझलकारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गझलक्रांती’ पुरस्कार यावर्षी प्रतिथयश गझलकारा सुनिता रामचंद्र यांना जाहीर झाला आहे. नवी मुंबई येथे १९ जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
गझल मंथन साहित्य संस्थेने गेल्या वर्षापासून महिला गझलकारांसाठी ‘गझलक्रांती’ हा मानाचा पुरस्कार सुरू केला.
गेल्यावर्षी पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनात अकोला येथील ज्येष्ठ गझलकारा देविकामाई देशमुख यांना प्रदान करण्यात आला होता. यंदाचा पुरस्कार गझलकारा सुनिता रामचंद्र यांना जाहीर झाला आहे. सुनिता रामचंद्र या सातत्याने उत्कृष्ट गझललेखन करतातच पण त्याबरोबरच त्या एक उत्तम कवयित्री, शिक्षिका आणि सायकलिस्ट आहेत. त्यांचा “अनफॉलो, अनफ्रेंड, अन ब्लॉक” हा कविता संग्रह प्रकाशित असून आजवर त्यांनी १२००० किलोमीटर सायकल प्रवास केला आहे.
येत्या १९ जानेवारी रोजी वाशी, नवी मुंबई येथे गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी, संमेलन समिती प्रमुख मुकुंदराव जाधव, समन्वयक प्रदीप तळेकर, मुंबई जिल्हाध्यक्षा प्रणाली म्हात्रे आदींनी केले आहे.