लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, घरात ही गोष्ट असेल तर मिळणार नाही लाभ

मुंबई : निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थी महिलांची आता राज्य सरकारकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारचा निर्णय
या योजनेअंतर्गत पात्र नसलेल्या अनेक महिलांना लाभ मिळत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी या योजनेतील लाभार्थींची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या फेरतपासणीसाठी सरकारकडून प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे.
अटींची पूर्तता न करणाऱ्यांना वगळणार
“ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल किंवा ज्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल,” असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत असलेल्या महिलांना केवळ फरकाच्या रकमेचा लाभ दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्राप्तीकर विभागाची घेतली जाणार मदत
अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याची खात्री करण्यासाठी सरकारकडून प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. महिलांच्या पॅन कार्डशी संबंधित माहिती मागवून उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे.
निवडणुकीपूर्वी सरसकट अर्ज स्वीकारले
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांचे अर्ज सरसकट स्वीकारण्यात आले होते. त्यावेळी उत्पन्नाची किंवा इतर कोणत्याही पात्रतेची पडताळणी करण्यात आली नव्हती.
सरकारी तिजोरीवर पडणारा ताण
या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या तब्बल अडीच कोटींच्या घरात आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. अपात्र महिलांना वगळून हा ताण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.