संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी बीड शहरात हाजारो नागरीकांचा मुक मोर्चा

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना अटक करा या मागणीसाठी हजारोच्या संख्येने नागरीकांनी शनिवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मुक मोर्चा काढला.
यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे फलक हातात घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. या बीड मधील सर्व पक्षीय मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अद्याप पकडण्यात अपयश येत आहे.या अन्याया विरोधात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने आज मोठ्या संख्येने जिल्हाभरातून जनता मोर्चात सहभागी झाली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या मुक मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये देशमुख कुटुंब, मनोज जरांगे, संभाजीराजे, नरेंद्र पाटील ,आ. जितेंद्र आव्हाड,खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके, आ. अभिमन्यू पवार,ज्योती मेटे, संगीता ठोंबरे, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, अनिल जगताप, परमेश्वर सातपुते,दीपक केदार, रणवीर पंडित, महेबुब शेख,रमेश पोकळे, रमेश आडसकर, मोहन जगताप, माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र मस्के, सक्षणा सलगर, आदींचा सहभाग होता.शनिवारी सकाळी 9 वाजल्या पासूनच जिल्हाभरातून नागरीक मोर्चात सहभागी होण्यासाठी यायला सुरुवात झाली होती. दुपारी साडेबारा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमा झाला.साधारणत: दुपारी 1वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मुक मोर्चाला सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक मोर्चा दाखल झाला. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा पावणे दोन दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोहोचला.हातात काळे झेंडे घेऊन फडकवत बीड जिल्ह्यातील अन्यायाच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चात महिलांची मोठा सहभाग असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यंत शांततेत हा मोर्चा निघाला होता.