डंपरने तिघांना चिरडले, बहिण – भावाचा मृत्यू
पुणे – मद्यधुंद डंपर चालकाने पादचारी रस्त्यावर झोपलेल्या तिघांना चिरडल्याची घटना पुण्यात घडली असून या घटनेत एका व्यक्तीसह दोन लहान बहिण-भावाचाही मृत्यू झाला.
पुणे शहरातील वाघोली भागात असलेल्या पोलिस ठाण्याच्या समोरील पादचारी मार्गावर रविवारी रात्रीला झोपलेल्या लोकांना डंपरने धडक देत चिरडले असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत. रात्री एक वाजता गजानन शंकर तोट्रे हा एमएच-12, व्हीएफ-0437 क्रमांकाचा डंपर चालवत होता, परंतु त्याने पादचारी मार्गावर चालविला आणि येथे झोपडलेले 9 जण या दुर्घटनेचे शिकार झाले असून यातील विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष आणि वैभव रितेश पवार वय 2 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैभवी व वैभव हे बहिण-भाऊ आहेत.
या दुदैवी घटनेत जानकी दिनेश पवार, रिनिशा विनोद पवार, रोशन शशादू भोसले, नागेश निवृत्ती पवार, दर्शन संजय वैराळ आणि आलिशा विनोद पवार हे सहा जण जखमी झाले आहेत व त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
डंपर चालक गजानन शंकर तोट्रो याच्यावर या घटनेसाठी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पादचारी मार्गावर झोपलेले हे सर्वजण नुकतेच रोजगाराच्या शोधासाठी अमरावतीहून आले होते.