बीडचा आठवडी बाजार ः असून अडचण नसून खोळंबा

रविवार विशेष – भाग-1
बीड – बीड शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या बिंदूसरा नदीच्या किनार्यावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो आणि यात हजारो जण भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बीड शहराच्या जवळपासच्या खेडेगावातून येतात, परंतु हाच आठवडी बाजार आता बीड शहरवासींयासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे शहरीवासी म्हणतात हा असून अडचण नसून खोळंबा आहे.
बीड शहराच्या मध्यभागातून बिंदूसरा ही नदी वाहते, त्यामुळे जुन व नवीन शहर असे दोन भाग पडले आहेत. या नदीच्या काठावर पूर्व-दक्षिण भागात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. शेतकरी व विक्रते हे भाजीपालांचे दुकान थाटून बसतात, तसेच विविध खाद्य पदार्थ तयार करुन विकण्याचे स्टॉलही येथे लागतात. बीड शहराच्या जवळपास असलेल्या विविध खेड्यापाडयातून शेतकरी, ग्राहक या आठवडी बाजारात भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी येतात. तसेच शहरातीलही ग्राहक या ठिकाणी भाजीपाला विकत घेण्यासाठी येतात.
आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रत्यांसाठी व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी नगरपालिकेने नदी काठ्यावर काही ओटे बांधले आहेत व काही मोकळी जागाही ठेवली आहे, परंतु विक्रत्यांची संख्या जास्त झाल्यामुळे व आपला माल लवकर विकला जावा या हेतूने भाजी विक्रते आता नदीच्या पुलावर बसू लागले व ते याच्याही पुढे येवून नदी पुल ते सुभाष रोड या भागातही बसू लागल्याने आधीच लहान असलेला रस्ता आडविला जात आहे आणि यामुळे वाहतुक कोंडी होते आहे.
शहरातील माळीवेस ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रविवारी प्रचंड अशी वाहतुक कोंडी होते त्यामुळे शहरी भागातील लोक या भागात नको रे जायचे असेच सांगत असतात.



बीड नगर पालिकेचे दुर्लक्ष
बीड नगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असून या समस्येवर कोणतीही उपाययोजना करत नाही. मात्र या विक्रत्यांकडून कर मात्र वसूल करते, याचा ताप मात्र सामान्य बीडकरांना होतो आहे. जुन्या बीडसाठी हा आठवडी बाजार संजवनी असला तरी नव्या बीडकरांसाठी तो डोकेदुखी व मनस्ताप देणारा ठरतो आहे.
अस्वच्छतेचे साम्राज्य म्हणजे आठवडी बाजार
आठवडी बाजार हा रविवारी भरतो व इतर दिवशी हे मैदान रिकामे असल्याने येथे अस्वच्छता पसरते. पुरुष मंडळी येथे मूत्रविसर्जन करण्यासाठी जातात तर जागो जागी प्लॅस्टीक पिशव्या, बाटल्या, खराब कपड्यांचे ढिग, मोकाट जनावरे बसलेले असतात. तर नदीतील पाणी वाहत नसल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून नदीतून घाण वास येतो आहे, अशा अस्वच्छ जागीही रविवारी विक्रते दिवसभर बसून आपला व्यवसाय करतात.