….त्या अधिकार्यावर कारवाई केली जाईल – अजित पवार

नागपूर – कल्याणमधील मराठी माणसाला मारहाण करणार्या त्या उत्तर भारतीय अधिकार्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत शुक्रवारी दिले.
कल्याणमधील योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा सोसायटीत राहणारा उत्तर भारतीय अखिलेश शुक्ला व मराठी व्यक्ती विजय कळवीट्टेकर यांच्यात वाद झाला. शुक्लांची पत्नी दररोज घराबाहेर धूप लावतात त्यामुळे विजय यांच्या घरातील व्यक्तींना त्रास होतो. यावरुन दोघात वाद झाला. शुक्ला हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात अकाऊंट मॅनेजर आहेत. शुक्ल व विजय यांच्यातील भांडण वाढल्याने ते सोडविण्यासाठी अभिजीत देशमुख व धीरज देशमुख मध्यस्थती करण्यासाठी गेले असता शुक्लांनी अभिजीत देशमुख यांनाच मारहाण केली.
शिवसेना उबाठा गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शुक्रवारी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, शुक्लांनी बाहेरुन लोक आणून मराठी माणसाला मारहाण केली तो सध्या रुग्णालयात भरती आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस हे कधीही सहन करणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन करताना म्हटले की, आमदार सुनील प्रभूंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो गंभीर असून इथे मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. जी माहिती आता मिळाली आहे ती ताबडतोब तपासून तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.