चुकीला माफी नाही! बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांची उचलबांगडी

बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे कोणी आरोपी सहभागी असतील त्याच्यासह प्रकरणाच्या मुख्यसूत्रधाराला सोडले जाणार नाही आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणार्या जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी विधानसभेत दिले.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने पूर्ण बीड जिल्हा हादरला होता आणि पवनचक्कीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या हत्येतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, परंतु या प्रकरणाचा संपूर्ण तपास करुन आरोपीना शिक्षा दिली जावे यासाठी जिल्हाभर आंदोलने केली गेली तसेच मागील चार दिवसापासून अनेक आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत निवेदन देत म्हटले की मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्येची गंभीर दखल घेतली असून प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.