बीडहून साईबाबा पालखीे व पायी दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान

बीड – दरवर्षी प्रमाणे मार्गशिर्ष महिन्यात दत्तजयंतीचे औचित्य साधून बीड शहरातील साई सेवा परिवाराच्यावतीने बीड ते शिर्डी अशी पायी दिंडी काढण्यात येते. यावर्षीची पायी दिंडीचे शनिवार दि.14 डिसेंबरला सांयकाळी शिर्डीकडे प्रस्थान झाले.
बीड शहरातील संत साईबाबांच्या भक्तांनी स्थापन केलेल्या साई सेवा परिवाराच्यावतीने दरवर्षी बीड ते शिर्डी अशी साईंची पालखी व पायी दिंडीचे आयोजन केले जाते आहे. या वर्षी ही पायी दिंडी दि.14 डिसेंबरला शिर्डीकडे निघाली असून त्यापूर्वी बीड शहरातून पायी दिंडीने परिक्रमा केली.
दुपारच्या वेळी साईंची पालखी जालना रोडवरील साई मंदिरातून निघाली आणि ती जालना रोड, साठे चौक, सुभाष रोड, माळीवेस,धोंडीपूरा, बलभीम चौक, कारंजा रोड,बशीरगंज मार्गे शिवाजी पुतळ्याजवळ आली आणि तेथून ती नगररोडकडे रवाना झाली. पालखीमध्ये दोन घोड्यांवर वाद्य वाजविणारे दोन स्वार होते आणि त्यामागे साईबांबाचे भजन व गीत वाजविणारा डिजे लावण्यात आला होता.
पालखीच्या परिक्रमा मार्गात जागो जागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि त्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच मार्गपरिक्रमामध्ये जागो जागी पालखीचे उत्साहने स्वागत करण्यात आले. यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. युवकांनी हातामध्ये भगवा ध्वज हाती घेतला होता व अतिशय शिस्तप्रिय पध्दतीने ते मार्गक्रमण करीत होते.
पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साई भक्तांनी गर्दी केली होती. ही पालखी व पायी दिंडी शनिवारी सांयकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला बीडहून शिर्डीकडे रवाना झाली आहे.
पायी दिंडी 14 ते 25 डिसेंबर पर्यंत चालणार असून जागो जागी मुकामाची सोय करण्यात आली आहे. हजारो साई भक्त यात सामिल झाले असून ते मजल दरमजल करत शिर्डीला पोहचणार आहेत.